रमेश हा नळफिटिंगचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. तो पत्नी बबिताला नेहमी मारहाण करायचा, असे सांगितले जाते. गेल्यावर्षी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणात पोलिसांनी रमेशला अटकही केली होती. ४ जानेवारीला बबिता या मुलगा व मुलीसह रामेश्वरी परिसरात वेगळ्या राहायला लागली. रमेश हा तिच्या घराभोवती चकरा मारायचा. मात्र, बबिता त्याला घरी बोलावत नव्हती. त्याला मुलांची आठवण येत होती. त्यामुळे तो व्यथित झाला होता. त्याचा संताप वाढत होता. शनिवारी सकाळी बबिता सायकलने जात होती. रामेश्वरीजवळील मंजुळ प्लाझा परिसरात रमेश चेहऱ्याला दुपट्टा बांधून मोटारसायकलवर आला. त्याने बाटलीतील अॅसिड बबिता यांच्या चेहऱ्यावर फेकले व पसार झाला. पोलिसांनी बबिताला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सीसीटीव्ही फुटेज व बबिता यांच्या संशयावरून पोलिसांनी रमेशला अटक केली. पत्नीवर अॅसिड फेकल्याचे त्याने मान्य केले.