हायलाइट्स:
- उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी साधला निशाणा
- फडणवीसांच्या टीकेला नवाब मलिकांनी दिले प्रत्युत्तर
- फडणवीसांनी शिवसेनेला संपवण्याचे काम केले- मलिक
पाच वर्षाचा निकाल पाहिला तर, भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षे युतीत सडलो, असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले, त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला, याकडेही नवाब मलिक यांनी लक्ष वेधले.
बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता. शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही कॉंग्रेससोबत असताना, शिवसेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता. परंतु काही कारणांमुळे जमले नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. २०१९ च्या आधीपासूनच भाजपकडून खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो, त्यांचे खच्चीकरण करतो, हे शिवसेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले, असेही नवाब मलिक म्हणाले.
शिवसेनेसोबत असताना भाजप मोठी झाली, हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. परंतु आठ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस शिवसेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
काय म्हणाले होते फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कालच्या भाषणात भाजपसोबत युतीत २५ वर्षे सडलो अशी खंत व्यक्त केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. २०१० पर्यंत किंवा अगदी २०१२ पर्यंत तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. मग तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाकडे बोट दाखवत आहात काय?’ असा सवाल फडणवीस यांनी केला. बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे काय, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, असेही फडणवीस म्हणाले.