कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ती बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. (Satej Patil Latest News)

या निवडणुकीबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. आतापर्यंत दोन वर्षात अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. त्या सर्व ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलो आहे. कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसची आहे. कोल्हापूरला पुरोगामी विचाराचा वारसा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वेगळी राजकीय संस्कृती आहे. यामुळेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघातली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांनी आमच्या सोबतच यावं, अशी अपेक्षा असणार आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. ही जागा काँग्रेसच्या हक्काची असल्याने ती आम्हालाच मिळावी असा दावा आपण करणार आहे,’ अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे.

Omicron Updates: भारतात करोनाची तिसरी लाट या तारखेपर्यंत पीक गाठणार; मुंबईला मोठा दिलासा!

‘देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार’

‘कोल्हापूर उत्तरची ही जागा बिनविरोध व्हावी, जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यावा यासाठी आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वैयक्तिक भेट घेणार आहे,’ असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी जयश्री जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक सारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के पोवार ,बाबा पार्टे,संध्या घोटणे,आदिल फारस यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here