हायलाइट्स:
- आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द खरा केला
- दत्तात्रेय लोहार यांना नवी कोरी बोलेरो दिली भेट
- लोहार कुटुंबाला मोठा आनंद
बोलेरो मिळाल्यामुळे लोहार कुटुंबाला मोठा आनंद झाला आहे. आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवराष्ट्रेच्या दत्तात्रेय लोहार यांनी भंगारातील वाहनांचे साहित्य वापरून मिनी जिप्सी तयार केली आहे. त्यांच्या मिनी जिप्सीचा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला होता. अनेकांनी त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केलं. महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीही दत्तात्रेय लोहार यांच्या मिनी जिप्सीची दखल घेतली होती. तसंच या मिनी जिप्सीच्या बदल्यात नवी कोरी बोलेरो देण्याचं ट्वीटद्वारे जाहीर केलं होतं. शब्द दिल्याप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी सोमवारी दत्तात्रय लोहार यांना बोलेरो भेट दिली.
सांगलीतील महिंद्राच्या शोरूममध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील आणि जितेश कदम यांच्या हस्ते पूजन करून गाडी लोहार यांना देण्यात आली.
फॅब्रिकेशनचे काम करणारे दत्तात्रेय लोहार यांनी गेल्या महिन्यात आनंद महिंद्रा यांची ऑफर नाकारून मिनी जिप्सी स्वतःजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरटीओ ऑफिसकडून मिनी जिप्सीला परवानगी मिळणार नसल्याने अखेर त्यांनी आनंद महिंद्रांची ऑफर स्वीकारली. यानिमित्ताने लोहार कुटुंबीयांचे चारचाकी गाडीचं स्वप्न साकार झालं आहे. बोलेरो भेट दिल्याबद्दल दत्तात्रेय लोहार यांनी आनंद महिंद्रा यांचे विशेष आभार मानले.