हायलाइट्स:
- थंडीत गारठून कॅनडा-अमेरिका सीमेवर चार भारतीयांचा मृत्यू
- गुजराती कुटुंब असल्याचं समोर
- ‘मानवी तस्करी’च्या आरोपाखाली एकाला अटक
- फ्लोरिडाचा रहिवासी स्टिव्ह शँड याला अटक
गेल्या आठवड्यात अमेरिका – कॅनडा सीमेजवळ एका अर्भकासह चार भारतीयांचं कुटुंब मृतावस्थेत आढळून आलं होतं. अधिकाऱ्यांनी या घटनेत मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय. भारतीय अधिकारी या घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
अमेरिकेन पोलिसांनी या घटनेत मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय. सर्व मृत भारतातून आले होते आणि कॅनडाहून अमेरिकेच्या सीमेत दाखल होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक हवामान बिघडल्यानं बर्फाळ भागातील अत्याधिक थंडीत गारठून त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला, असा संशय व्यक्त करण्यात येतोय. एमर्सन भागाजवळ कॅनडा-अमेरिका सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर हे मृतदेह आढळून आले. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय स्टिव्ह शँड याला अटक करण्यात आलीय.
मानव तस्करीचा संशय
या घटनेआधी कॅनडातून अमेरिकेत केल्या जाणाऱ्या मानवी तस्करीच्या आरोपाखाली अमेरिकन अधिकाऱ्यांनी वैध कागदपत्रं सोबत नसलेल्या सात जणांना आणि एका अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. १९ जानेवारीला अमेरिका-कॅनडा सीमेजवळील मिनेसोटा राज्यातील अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना वैध कागदपत्रं सोबत नसलेले काही जण आढळले होते. त्यांच्याकडून मिळालेली माहिती कॅनडाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला असता सीमेच्या कॅनडाच्या बाजूला मॅनिटोबा प्रांतात चार मृतदेह सापडल्याचं त्यांनी सांगितलं.
मृतांत एक दाम्पत्य, एक मुलगा आणि एका अर्भकाचा समावेश आहे. हे चारही जण थंडीमुळे मरण पावल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे कुटुंब गुजराती असल्याचं समोर येतंय.
टोरँटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासानं ताबडतोब मॅनिटोबाला एक पथक पाठवलं असून ते मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. वाणिज्य दूतावास तसंच ओटावा इथल्या उच्चायुक्तालयदेखील या घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.