हायलाइट्स:
- ठाण्यातील १० वर्षांच्या सई पाटीलची कमाल
- काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास
- ९ राज्यांतून ४ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास
- आठ वर्षांची असताना सईने केला होता समुद्रातून पोहण्याचा विक्रम
ठाण्यातील बालकुम परिसरात राहणाऱ्या १० वर्षीय सईने काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास केला आहे. ‘मुली जगवा, मुली शिकवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, पर्यावरणाचा समतोल राखा, पेट्रोलचा वापर कमी करून जास्तीत जास्त सायकलचा वापर करा, असा संदेश तिने या सायकल प्रवासादरम्यान दिला आहे. या सायकल प्रवासात तिने काश्मीर, जम्मू, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, कन्याकुमारी अशा एकूण नऊ राज्यांतून प्रवास केला आहे. प्रत्येक ठिकाणी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मदत मिळाली आहे. हा काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास तब्बल ४ हजार १६५ किलोमीटरचा असून, हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला ३८ दिवसांचा कालावधी लागला आहे.
मृत्यू समोर दिसत असतानाही सोडली नाही पतीची साथ…
सई आशिष पाटील असे तिचे पूर्ण नाव असून, ती १० वर्षाची आहे. ठाण्यातील श्री माँ शाळेची विद्यार्थिनी आहे आणि पाचवी इयत्तेत ती शिकते. याआधीही ८ वर्षांची असताना सईने ५० फुटांवरून खाडीत उडी मारून पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सईने बालकुम ते एकविरा असा पोहण्याचा विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे अमृतसर ते अटारी बॉर्डर असा देखील समुद्रीप्रवास सईने ८ वर्षांची असताना केला आहे.
१० वर्षीय सई आपला ३८ दिवसांचा आणि ४ हजारांहून अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास संपवून रविवारी ठाण्यातील बाळकुम येथे घरी परतली. त्यावेळी बाळकुम परिसरात तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. बाळकुमचे नगरसेवक संजय भोईर आणि देवराम भोईर आणि बाळकुममधील नागरिकांनी ढोल-ताशांचा गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून तिचं स्वागत केलं.