करोनाचे आणखी दोन रुग्ण सापडल्यानं जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असून, शहर सीमा बंद केल्या आहेत. मृत व्यक्तीच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांना आरोग्य यंत्रणेकडून तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ३२ जणांचे स्वब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सुमारे ७१ जणांना रविवारी सायंकाळपर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नागपूर येथून प्राप्त झालेले २० जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सोमवारी काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज मंगळवारी सकाळी मिळालेल्या तीन अहवालांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. हे दोघेही मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. यात एक ६५ वर्षीय वृद्ध असून, एका १२ वर्षीय मुलीचा यात समावेश आहे. अजून नऊ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. आरोग्य विभागानं ४० पथके तयार केली असून, शहरात घरोघरी जाऊन ते तपासणी करत आहेत. नागरिकांनी घरातच राहवे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांनी ‘ॲक्शन प्लान’ तयार केला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मृत रुग्णाचा निवासी परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. अजूनही कोणी मृताच्या संपर्कात आले असेल, तर त्यांनी स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times