हायलाइट्स:
- प्रसिद्धीसाठी किरीट सोमय्या यांचे प्रयत्न नेहमी सुरुच असतात
- महाविकासआघाडी सरकारचे नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात किरीट सोमय्या हे कायम आघाडीवर असतात
महाविकासआघाडी सरकारचे नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात किरीट सोमय्या हे कायम आघाडीवर असतात. त्यामुळे सोमय्या आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये अधूनमधून शाब्दिक चकमकी सुरु असतात. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांना डिवचले होते. नवाब मलिक यांना मला काहीतरी भेट/बक्षीस (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश, राजकीय वादाला सुरुवात
सोशल मीडियावर सध्या किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे नगरविकास खात्याच्या कार्यालयातील छायाचित्र व्हायरल होत आहेत. यामध्ये किरीट सोमय्या सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून नगरविकास खात्याच्या फाईल्स चाळताना दिसत आहेत. या छायाचित्रावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी किरीट सोमय्या यांना थेट मंत्रालयातील फाईल्स तपासण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल उपस्थित केला होता. मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांची ‘सरबराई’ करणे सरकारी अधिकाऱ्यांना आता चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.
या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याची माहिती आहे. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या सरकारी अधिकाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर आता संबंधित अधिकारी आणि किरीट सोमय्या काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.