हायलाइट्स:
- नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता
- उच्च न्यायालयानेही नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता
आज अचानक नितेश राणे वकील संग्राम देसाई यांच्यासह कणकवली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांकडून जवळपास ५० मिनिटे नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. मात्र, नितेश राणे व त्यांच्या वकिलांनी बाहेर पडल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन उजळेकर हेदेखील या सगळ्याविषयी मौन बाळगून आहेत.
दोनवेळा अपयश, राणेंनी आता वकीलच बदलला
संतोष परब हल्लाप्रकरणात सत्र आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याठिकाणीही जामीन न मिळाल्यास नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे आता नितेश राणे यांचा वकील बदलण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे नितेश राणे यांची बाजू मांडणार आहेत. मुकुल रोहतगी यांचा आजपर्यंतचा लौकिक पाहता नितेश राणे यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची शक्यता कैकपटीने वाढली आहे.
यापूर्वी सत्र व उच्च न्यायालयात नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. अॅडव्होकेट संग्राम देसाई, अॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत या वकिलांनी नितेश राणे यांच्यासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावले होते. तरीही सत्र आणि उच्च न्यायालयात नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नव्हता. त्यामुळे आता मुकुल रोहतगी हे सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नाकारला असला तरी २७ जानेवारीपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.