अहमदनगर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील गैरव्यवहाराची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘हजारे यांच्या मागणीनुसार यापूर्वीच राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यातून काहीही गैर आढळून आलेलं नाही आणि यावर आता बोलण्यासारखे काही राहिलं नाही,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. (Hasan Mushrif In Ahmednagar)

मंत्री मुश्रीफ नगर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी यासंबंधी विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. हजारे यांनी सोमवारीच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. सहकारी साखर कारखाने जाणीवपूर्वक आजारी पाडले आणि नंतर त्यांची कवडीमोल भावाने विक्री करण्यात आली. यामध्ये सुमारे २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. राज्य सरकारकडे विविध पातळ्यांवर पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी आता केंद्रात नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता?, आता उद्धव ठाकरेंकडून एका वाक्यात प्रत्युत्तर

यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘अण्णा हजारे यांनी यासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी झाली आहे. आता त्यांनी नव्याने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचं वाचण्यात आलं. जे सहकारी साखर कारखाने तोट्यात गेल्याने बंद पडले होते, त्यांच्यावर राज्य सहकारी बँकेचे कर्ज होते. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने आणि संबंधित जिल्हा बँकांनी रितसर प्रक्रिया पार पाडली आहे. संबंधित कारखान्यांचे मूल्यांकन करून लिलाव केले. जास्त बोली लावलेल्यांना ते नियमानुसार विकले आहेत. याची सर्व चौकशी योग्य त्या यंत्रणामार्फत झालेली आहे. यात काहीही चुकीचं आढळून आलेलं नाही. त्यामुळे यावर आता जास्त काही बोलण्यासारखंही राहिलं नाही,’ असंही मुश्रीफ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here