कोल्हापूर : ई-पास आणि रांगेवरून अंबाबाई मंदिरात मंगळवारी सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. विशेष म्हणजे हे सर्व भाविक जालना जिल्ह्यातील एकाच गावचे होते. पोलिसांनी सर्वांना समज देवून सोडून दिले.

करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात तासाला ८०० भाविकांना ई-पास देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे.

मंगळवारी सकाळी जालना येथील भाविक कोल्हापुरात अंबाबाई दर्शनासाठी आले होते. सर्वजण ई-पाससाठी असलेल्या रांगेत उभे होते. अचानकपणे उभे राहण्याच्या कारणांवरून भाविकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रुपांतर मारामारीत झाले. पुरुष आणि महिला एकमेकांना चप्पल आणि खुर्ची फेकून मारत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र; राष्ट्रवादीचे मंत्री म्हणाले…

मंदिर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तेथे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आले. त्यांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले. सर्वांना समज दिली आणि वाद मिटला.

दरम्यान, गेले १५ दिवस अंबाबाई मंदिरात तासाला केवळ ४०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. मंगळवारपासून ही मर्यादा ८०० केल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. याशिवाय ई पासचा काहींनी काळाबाजार मांडल्याने मंदिराच्या आवारात देवस्थानच्या वतीने ई पास काढून देण्याची सोय करण्यात आली आहे. ज्योतिबा मंदिरातही अशा प्रकारची सुविधा देण्यात येणार असल्याचं नाईकवाडे यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here