नागपूर : पावसाळी वातावरण संपून वातावरण कोरडे होताच राज्यासह विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. मंगळवारी बुलडाणा (९.२ अंश) येथे सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. तसेच नागपुरातही १०.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत नागपुरात ३.७ अंशांची घसरण झाली आहे.

प्रजासत्ताकदिनानंतर उत्तरेकडे थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने सोमवारीच वर्तविला होता. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होता. महाराष्ट्र तसेच विदर्भाचा यात उल्लेखही नव्हता. मात्र सोमवारी संध्याकाळपासून महाराष्ट्रातही अचानक थंडी वाढली. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमधील तापमान सरासरीपेक्षा किमान तीन अंशांनी कमी आहे. त्यामुळे आता राज्यातसुद्धा थंडीची लाट असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. २७ जानेवारीपर्यंत ही लाट कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. तोवर मात्र, विदर्भातील सरासरी किमान तापमान हे दोन ते तीन अंशांपेक्षा कमी असेल. यामुळे परत एकदा सर्दी, खोकला अर्थात व्हायरलचे रुग्ण वाढण्याचीही शक्यता नकारता येत नाही. दरम्यान, मंगळवारी महाबळेश्वर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे ८.८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. हे राज्यातील सर्वाधिक कमी तापमान होते.

पर्यावरण मंत्री आदित्य आजपासून औरंगाबाद दौऱ्यावर, पण त्यापूर्वीच…
या मोसमातील पहिली लाट

सहसा नागपुरात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे गारठ्याचे महिने समजले जातात. या महिन्यांमध्ये थंडीच्या किमान दोन ते तीन लाटांची हजेरी लागते. मात्र, यंदाच्या मौसमात अर्थात २०२१च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर एकाही लाटेची नोंद करण्यात आली नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्येसुद्धा थंडीची लाट आली नाही. अखेर जानेवारीच्या अंतिम आठवड्यात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमातील थंडीची ही पहिलीच लाट असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

फडणवीस म्हणाले, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता?, आता उद्धव ठाकरेंकडून एका वाक्यात प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here