औरंगाबाद : राज्य सरकार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याच्या निषेधार्थ नियुक्त्या रखडलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिवनेरी ते मुंबई आक्रोश वाहन यात्रा निघणार आहे. नऊ मार्चपासून निघणारी यात्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर धडकणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवनेरी येथे अभिवादन करून नऊ मार्च रोजी सकाळी १० वाजता आक्रोश वाहन यात्रा निघणार आहे. पनवेल, नवी मुंबई, चेंबूरमार्गे यात्रा मुंबईत जाणार आहे, असे केरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राहुल पाटील, पवन उफाड, नागेश शिंदे, सदानंद जाधव, संदीपान मोटे, अविनाश अंभोरे, धर्मराज जाधव, प्रवीण ढोले आदी उपस्थित होते.