हायलाइट्स:

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत निभावणार महत्त्वाची भूमिका?
  • ‘तणाव कमी करण्यासाठी भारताच्या भूमिकेचं स्वागतच’
  • ‘व्हाईट हाऊस’च्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य

वॉशिंग्टन, अमेरिका :

रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील वाढता युद्धाचा धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, असा विश्वास अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी भारताच्या भूमिकेचं स्वागतच केलं जाईल, असं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष भवन ‘व्हाईट हाऊस’च्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलंय.

यापूर्वी, भारत हा अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या जवळ असल्यानं युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांनीही सूचित केलं होतं.

याबद्दल बोलताना, ‘तिसऱ्या महायुद्धाचा तणाव कमी करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांचं आम्ही स्वागतच करतो. आम्ही अनेक सहकार्‍यांच्या संपर्कात आहोत, परंतु भारतीय अधिकार्‍यांशी कोणत्याही चर्चेबद्दल बोलण्यासारखं सध्या काहीही नाही’ असं वक्तव्य व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी पत्रकार परिषदेत केलं.

Russia – Ukraine Crisis: ‘युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं तर दुसऱ्या महायुद्धाहून मोठा विध्वंस’, ब्रिटनचा रशियाला इशारा
Russia-Ukraine Crisis: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? रशिया – युक्रेन तणावामागची कारणं समजून घ्या…
रशिया विरुद्ध युक्रेन : ‘नाटो’ युक्रेनला पुरवणार लष्करी बळ

दरम्यान, रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर त्याचा परिणाम जगभर दिसून येऊ शकतो, असं अमेरिकेनं म्हटलंय. युद्ध परिस्थिती ओढावली तर रशियावर अत्यंत कठोर निर्बंध घालण्यात येतील, अशी धमकी वजा सूचना अमेरिकेकडून देण्यात आलीय.

रशियानं युक्रेनच्या दिशेने वाटचाल केल्यास २०१४ मध्ये युक्रेनपासून क्रिमिया तोडत त्यावर ताबा मिळवल्यानंतर लादण्यात आलेल्या निर्बंधांपेक्षा अधिक कठोर निर्बंध लादले जातील, असं अमेरिकेनं म्हटलंय. तसंच, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांन स्वत:ला देखील या निर्बंधांच्या कक्षेत आणण्याचा इशारा अमेरिकेनं दिलाय.

‘युक्रेनवर रशियानं हल्ला केलाच तर त्याचे मोठा परिणाम जगभर दिसून येईल आणि आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावरही निर्बंध लादण्यापासून मागे हटणार नाही,’ असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलंय.

महत्त्वाचं म्हणजे, अमेरिकेकडून काही दिवसांपूर्वीच युक्रेनला लष्करी मदत म्हणून आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचं भांडार पुरवण्यात आल्यानंतर अमेरिकेकडून हे वक्तव्य आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here