करोनाच्या संकटामुळे अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात डाळीची खरेदी करत असल्याने मागणीत तिप्पट वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे आवक होत नसल्याने डाळींच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. ऐंशी रुपये किलोने मिळाणाऱ्या तूरडाळीचे भाव आता शंभरीवर पोहोचले आहेत. ही स्थिती आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईच्या बाजारात डाळींची आवक राजस्थान, मध्य प्रदेश तसेच राज्यातील नागपूर, अकोला व यवतमाळ या शहरांतून होते. लॉकडाऊनदरम्यान धान्याच्या वाहतुकीवर बंधने नसली तरी टेम्पो, ट्रकचालकच गाडी नेण्यास तयार नाहीत. यामुळे डाळींची आवकच झालेली नाही. परिणामी आहे तो माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतोय.
अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (कॅट) मुंबई विभागाचे सचिव रमणिकभाई छेडा यांनी सांगितले की, ‘अनेक ग्राहक थेट घाऊक पद्धतीने खरेदी करू लागले आहेत. अनेकांनी भरमसाठ खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या डाळींची मागणी तिप्पटीने वाढली आहे. मात्र राजस्थानहून येणारी मूगडाळ, अन्य शहरातून येणाऱ्या तूरडाळीची आवकही रखडली आहे. यातूनच भाववाढ होत आहे. या आठवड्यात आवक काही प्रमाणात सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.’
आठवड्याभरात स्थिती सुधारेल
मुंबईच्या बाजारात दररोज ५५० ते ६०० गाड्या इतकी डाळींची मागणी असते. त्या तुलनेत आवकही तेवढीच असते. पण सध्या आवक १०० गाड्याही नाही. त्याचवेळी मागणी एक हजार १२०० गाड्या आहे. व्यापाऱ्यांकडे जुना साठा असल्याने तो माल सध्या पुरवणे सुरू आहे. आवक लवकर सुरळीत होण्याची गरज व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
डाळींचे भाव
प्रकार आधी आता
तूरडाळ ८५-९० १००-१०५
मूगडाळ ९०-१०० १२०-१३०
हरभरा डाळ ७५-८० ८५-९५
मसूर डाळ ६५-७० ८०-८५
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times