हायलाइट्स:
- शेतीसाठी वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकर्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ओतले पेट्रोल
- दहा महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी पाठपुरावा
महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करुनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळत आहेत. त्यामुळे वीज कंपनीच्या कारभाराला कंटाळून योगराज प्रल्हाद पाटील या शेतकऱ्याने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
अमळनेर तालुक्यातील सात्री येथील रहिवासी योगराज पाटील हे शेतकरी असून त्यांच्याकडे दहा बिघे एवढी शेती आहे. शेतीत मक्याचे पीक लावलं आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावं यासाठी ते तब्बल १० महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले, मात्र त्यानंतरही कुठलीही कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही.
दुसरीकडे वीज कनेक्शन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक जळत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे व महावितरण कंपनीचा कारभाराला कंटाळून योगराज पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले.
‘अधिकारी व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप यामुळे माझ्या शेतीसाठी वीज कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे शेतातील पिके डोळ्यासमोर जळत असल्याने आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता,’ अशा शब्दांत शेतकरी योगराज पाटील यांनी आपली व्यथा मांडली आहे.