हायलाइट्स:
- अखेर बछड्याला अलगद घेऊन गेली बिबट्या मादी
- वन विभागाच्या कॅमेऱ्यात बिबट्या आणि बछड्याची भेट झाली चित्रित
- सांगली जिल्ह्यातील घटना
वाटेगावातील शिवाजी शंकर गावडे यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. मंगळवारी सकाळी काही ऊसतोड मजुरांना उसात बिबट्या मादी आणि एक बछडा आढळला. यावेळी ऊसतोड मजुरांनी गोंधळ करताच बिबट्या उसाच्या शेतातून निघून गेला, तर बछडा मात्र ऊसातच राहिला. उसात बिबट्या आणि बछडा आढळल्याची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावडे यांच्या शेतात धाव घेतली.
ऊस तोडीचे काम थांबून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा लावला. आईपासून दुरावलेला बछडा दिवसभर अस्वस्थ होता, तर परिसरात बछड्याची आई वावरत असणार, याची खात्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होती. सापळ्यात जेरबंद झाली नाही तरी चालेल, पण मादी बिबट्या आणि बछड्याची भेट व्हावी, अशी सर्वांचीच मनोमन इच्छा होती. अखेर रात्री नऊच्या सुमारास गावडे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या पोहोचला. काही क्षणात बछड्याला तोंडात अलगद घेऊन तो निघून गेला. मादी बिबट्या आणि बसण्याच्या भेटीचा प्रसंग वन विभागाच्या कॅमेरात चित्रित झाला आहे.
दरम्यान, शिराळा आणि वाळवा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्यांकडून हल्ले होऊन काही दुर्घटना घडू नयेत, यासाठी वन विभागाने दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.