म. टा. प्रतिनिधी, पुणे

सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध संस्थांप्रमाणेच विविध समाजमंदिरांनीही ‘करोना’मुळे संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गणेश पेठेतील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारातर्फे रोज शेकडो विद्यार्थी, कामगार आणि गरजू व्यक्तींना जेवण देण्यात येते आहे. आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक लोकांना गुरुद्वाराने महाप्रसाद दिला आहे.

गुरुद्वारातर्फे एरवी वर्षभर लंगर म्हणजेच महाप्रसाद लोकांना दिला जातो. सध्या संचारबंदीमुळे गुरुद्वारातील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले असले, तरी गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील दानशूर शीख बांधव या उपक्रमासाठी किराणा साहित्य उपलब्ध करून देत आहेत. संस्थेतील उत्साही कार्यकर्ते रोज सकाळी स्वतः जेवण बनवत आहेत.

गेल्या आठवड्याभरात पोलिस कर्मचारी, कमला नेहरु हॉस्पिटलमधील कर्मचारी, बुधवार पेठेतील देवदासी, शिकण्यासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी आणि गरजू व्यक्ती अशा साडे चार हजारांहून अधिक लोकांना गुरुद्वारातर्फे लंगर देण्यात आला. गुरू गोविंदसिंग यांची शिकवण आणि सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आम्ही संकटात सापडलेल्यांना मदत करीत आहोत. या कामामध्ये गुरुद्वाराचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो आहे, अशी माहिती गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे मुख्य प्रचारक भोलासिंग अरोरा यांनी दिली.

संस्था, संघटनांच्या माध्यमातून गरजूंना पोहोच

कोणतीही व्यक्ती अन्नाशिवाय राहू नये, या हेतूने लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील गुरुनानक दरबार गुरुद्वारात दररोज आठ ते दहा हजार पोळ्या आणि हजार किलो खिचडी तयार करण्यात येते आहे. गुरुद्वारातील पंधरा ते वीस लोक दररोज हे अन्न तयार करण्याचे काम करतात. दुपारी आणि सायंकाळी हे अन्न शहराच्या विविध भागांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या माध्यमातून गरीब, कष्टकऱ्यांना दिले जाते. लष्कराचे कर्मचारी देखील गुरुद्वारातून पोळ्या घेऊन कँटोन्मेंट भागातील गरीब व्यक्तींना देत आहेत, अशी माहिती गुरुद्वाराचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here