हायलाइट्स:

  • सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन
  • पत्रकारनगर येथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
  • लेखनासह व्यसनमुक्तीसाठी अवचट यांनी दिलं मोठं योगदान

पुणे : प्रसिद्ध लेखक आणि कलावंत तसंच व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. (Writer And Activist Anil Avchat Passes Away) मराठी साहित्यामध्ये डॉ. अनिल अवचट यांनी मोलाचं योगदान दिलं. दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे.

पत्रकारनगर येथे आज दुपारी २ वाजेपर्यंत डॉ. अवचट यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील, असं मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

लता मंगेशकरांसाठी अयोध्येत केला जातोय महामृत्युंजय जप, साधुसंतांनी मोदींनाही केलं आवाहन

अनिल अवचट यांचे कार्य :

अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. महाविद्यालयीन जीवनात डॉक्टरांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध केले. तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले.

महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर डॉ. अनिल अवचट यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. डॉ. अवचट स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी तसेच विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही लिखाण केलं.

सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या. डॉ. अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार तसंच त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here