हायलाइट्स:
- मुंबईत पुन्हा आगीचा भडका, तीन जण होरपळले
- तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू, एकाची प्रकृती चिंताजनक
- गॅस गळती झाल्याने घरात लागली आग
- ताडदेव आगीतील मृतांचा आकडा ८ वर
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील काजूपाडा परिसरातील एका सोसायटीतील घरात आग लागली. घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागली. या आगीत तीन जण होरपळले आहेत. बुधवारी रात्री ८.०८ वाजता लागलेली आग साधारण पावणे नऊ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. या तिघांनाही सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गॅस गळतीमुळे घरात आग लागली. या आगीत हकिम मुल्ला खान (वय ५०), सोहेल खान (वय २४) आणि सलीम अन्सारी (वय ३८) हे जखमी झाले आहेत. या तिघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीत दोघे जण १० ते १५ टक्के भाजले असल्याची माहिती देण्यात आली. तर सलीम अन्सारी हा तरूण ८५ टक्के भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी राजावाडीतून सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.
ताडदेव आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८ वर
मुंबईतील ताडदेव येथील २० मजली इमारतीत १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा आठवर पोहोचला आहे. माधुरी चोपडेकर या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली. तर पाच जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून, इतर पाच जणांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात आले.