हायलाइट्स:

  • सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली
  • नितेश राणे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. तर राज्य सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली

प्रसाद रानडे, रत्नागिरी: संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. नितेश राणे यांनी येत्या १० दिवसांमध्ये सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामिनाची अपेक्षा असलेल्या नितेश राणे यांना झटका बसल्याचे मानले जात आहे. परंतु, नितेश यांचे बंधू निलेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय हा आमच्यासाठी एकप्रकारचा दिलासा असल्याचे म्हटले. ते गुरुवारी गुहागर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी निलेश राणे यांनी म्हटले की, अशा निर्णयाला दिलासाच म्हणतात. न्यायालयाने १० दिवसांचा दिलासा दिला आहे. या काळात आम्ही सत्र न्यायालयात जाऊन जामिनासाठी अर्ज करु. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असे म्हणतात येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आज नितेश राणे यांना हजर राहायला सांगितलं असतं तर जामीन फेटाळला गेला, असे बोलू शकलो असतो. पण तसे न झाल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
Nitesh Rane: लघु सुक्ष्म दिलासा! अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचा नितेश राणेंना टोला
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. हिमा कोहली आणि न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी नितेश राणे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. तर राज्य सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. या दोन्ही वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामिनाची मागणी मान्य करण्यास नकार दिला. परंतु, त्यांना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. नितेश राणे यांनी १० दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. नियमित जामिनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

ठाकरे सरकारचा नितेश राणेंच्या अटकेसाठी अट्टाहास: प्रवीण दरेकर

सर्वोच्च न्यायालयाने संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी त्यांना अटकेपासून १० दिवस संरक्षण देऊन त्यांना अंशत: का होईना पण दिलासाच दिला आहे, असे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले. नितेश राणे यांना अटक करण्यासाठी ठाकरे सरकारचा अट्टाहास सुरु आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे पुन्हा सत्र न्यायालयात जात नाही तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. नितेश राणे यांच्यासाठी हा एकप्रकारचा दिलासा आहे. आता नितेश राणे पुन्हा सत्र न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडतील. त्यावेळी सत्र न्यायालय त्यांना निश्चित जामीन देईल, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here