हायलाइट्स:
- भारतातील वाढत्या असहिष्णुततेवर टिप्पणी
- हिंदू राष्ट्रवादाबद्दल चिंता व्यक्त केली
- ‘भारतीय अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’कडून कार्यक्रमाचं आयोजन
भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलेल्या एका वक्तव्यानं मोदी सरकारला पुन्हा एकदा हादरा दिलाय. भारत आपल्या संवैधानिक मूल्यांपासून दूर जात असल्याचं सांगतानाच भारतात असहिष्णुतेत वाढ होत असल्याचं अन्सारी यांनी नमूद केलंय. हिंदू राष्ट्रवादाच्या उदयाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केलीय.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी निगडीत संस्थेच्या एका कार्यक्रमात हमीद अन्सारी यांनी हे विधान केलंय. या कार्यक्रमाचं आयोजन १७ अमेरिकन संघटनांनी केलं होतं. यामध्ये ‘भारतीय अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’चाही सहभाग आहे. त्यानंतर एक नवा वाद उभा राहिलाय.
त्रिपुरा सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात ‘भारतीय अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’ ही संघटना आयएसआय आणि इतर अतिरेकी गटांशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं.
‘गेल्या काही वर्षांत आम्ही अशा प्रवृत्ती आणि वर्तनांचा उदय पाहिला आहे जे आधीच्या प्रस्थापित नागरी राष्ट्रवादाच्या विरोधात आहेत तसंच ते सांस्कृतिक राष्ट्रवादाची काल्पनिक व्यवस्था लागू करू इच्छितात. निवडणुकीतील बहुमताला धार्मिक बहुमत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच राजकीय सत्तेवर एकाधिकारशाही लागू करण्याची त्यांची इच्छा आहे. नागरिकांत त्यांच्या आस्थेच्या आधारावर फूट पाडण्याची आणि असुरक्षिततेला प्रोत्साहन देताना असे लोक दिसतात’, असं यावेळी अन्सारी यांनी म्हटलंय.
भाजपचं प्रत्यूत्तर
हमीद अन्सारी यांचं हे वक्तव्य सत्ताधारी भाजपला भलतंच झोंबलंय. भाजप नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी अन्सारी यांच्यावर पलटवार करत त्यांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिलंय.
मोदींवर टीका करण्याच्या वेडाचं रूपांतर आता भारतावर टीका करण्याच्या कटात झाल्याची टीका नक्वी यांनी केलीय. ‘अल्पसंख्याकांच्या मतांचा गैरफायदा घेणारे आता देशातील सकारात्मक वातावरणामुळे चिंतेत आहेत’ असंही त्यांनी म्हटलंय.