हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
- अनेक कर्मचारी मागण्यांवर ठाम
- डोंबिवलीतील एसटी कर्मचारी विकतोय भाजीपाला
- कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून विकतोय भाजीपाला
कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन असलेले शहर आहे. कल्याणजवळच विठ्ठलवाडी येथेही एसटी आगार आहे. राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय कामावर हजर न होण्याच्या मुद्यावर अनेक कामगार आजही ठाम आहेत. संप सुरू असल्याने बस डेपोचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हाती पगार नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न प्रत्येक कामगारासमोर आहे. विठ्ठलवाडी बस आगारात चालक-वाहक म्हणून काम करणारे ३३ वर्षीय प्रमोद चिमणे हे संपात सहभागी आहेत. त्यांच्या गावी त्यांचे आईवडील आहेत. मात्र ते डोंबिवली नजीकच्या निळजे गाव परिसरात राहतात. ते पत्नी आणि दोन मुलांसह डोंबिवली परिसरात राहतात. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न त्यांना सतावतो आहे. प्रमोद चिमणे यांनी संपात सहभाग घेतला आहे. मात्र कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ते भाजीपाला विकत आहेत. आगारात काम करून त्यांच्या हाती १२ हजार रुपये पगार येत होता. आता भाजीपाला विकून त्यांना दिवसाला दोनशे ते तीनशे रुपये मिळतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा गाडा ते कसाबसा हाकत आहेत.
आईवडील वृद्ध आहेत. ते गावी आहेत. पत्नी आणि दोन मुलांसह डोंबिवलीत राहतो. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मी भाजीपाला विकायला सुरुवात केली. कारण १२ हजार रुपये मासिक पगार आहे, खोलीचे भाडे पाच हजार आहे. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी इथे हातगाडी लावली. मात्र पालिका प्रशासन आणि स्थानिक दुकानदाराने भाजीपाला विकू दिला नाही. आता रस्त्यावर भाजीपाला विकायला सुरुवात केली आहे, असे प्रमोद यांनी सांगितले. ३० ते ३५ वर्षांपासून कर्मचारी काम करत आहेत. आज त्यांची अवस्था बिकट आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा सुरूच राहील, असा ठाम निर्धार प्रमोद यांनी केला.