हायलाइट्स:
- डॉक्टरला तीन लाख रुपयांची मागितली खंडणी
- चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
- आरोपींमध्ये दोन शिक्षकांचाही समावेश
या प्रकरणातील आरोपींमध्ये माध्यमिक शाळेचे दोन शिक्षक, एक शिक्षण संस्थाचालक आणि एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा समावेश आहे. पोलीस पकडण्यास येत असल्याचं पाहून कारमधे बसलेले आरोपी बॅग फेकून पळून गेले. आरोपी मच्छिंद्र राधाकिसन आठरे याला पकडण्यात आले. आरोपी शैलेंद्र जायभाय, मिथुन डोंगरे व नवनाथ उगलमुगले पळून गेले. या प्रकरणी पाथर्डीतील डॉ. विनोद त्रिंबक गर्जे यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. गर्जे यांनी आरोग्य विभागाकडून परवानगी घेऊन पाथर्डीत कोव्हिड हॉस्पिटल सुरू केलं आहे. यासंबंधीची आवश्यक ती माहिती त्यांनी आरोग्य विभागाला सादरही केली आहे. मात्र, यातील आरोपी शैलेंद्र जायभाय याने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला. त्याद्वारे गर्जे हॉस्पिटलची माहिती मागवली होती. तसंच डॉ. आव्हाड यांनी पत्र पाठवून डॉ. गर्जे यांनी ही माहिती परस्पर जायभाय यांना द्यावी व त्याची एक प्रत उपजिल्हा रुग्णालयात द्यावी, असं कळवलं होतं. मात्र आरोपी शैलेंद्र जायभाय व नवनाथ उगलमुगले यांनी डॉ. गर्जे यांना १४ जानेवारी रोजी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तक्रारी आणि बदनामी करून हॉस्पिटल बंद पाडण्याची धमकीही दिली होती.
दरम्यान, २५ जानेवारी रोजी डॉ. गर्जे तालुक्यातील खरवंडी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे आणखी एक आरोपी मिथुन डोंगरे याने मध्यस्थी करत चार लाखांची खंडणी मागितली. त्यावर तडजोड होऊन तीन लाख रुपयांची खंडणी देण्याचं ठरलं. मात्र, डॉ. गर्जे यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. गर्जे यांच्यासोबत सापळा रचला. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील, सचिन रणशेवरे, श्रीकांत डांगे, अनिल बडे, देविदास तांदळे, राहुल तिकोने, राम सोनवणे यांच्या पथकाने तनपुरवाडी शिवारात छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून आरोपी शैलेंद्र जायभाय व मिथुन डोंगरे पळून गेले. आरोपी आठरे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून इतरांचा शोध सुरू आहे.