इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला (Terror Attack in Balochistan)झाला असून त्यात १० जवान शहीद झाले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या अशांत दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील केच जिल्ह्यात हा हल्ला (Pakistan Terror Attack)झाला. सुरक्षा दलाच्या एका चेक पोस्टला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले.
पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी या हल्ल्याची माहिती दिली. लष्कराच्या मीडिया विभाग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दिलेल्या माहितीनुसार, २५-२६ जानेवारीच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात १० जवान शहीद झाले, तर लष्कराच्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला आणि अनेक जण जखमी झाले.
तीन दहशतवादी पकडले
या कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान प्रांत अनेक दिवसांपासून हिंसक बंडखोरीचा केंद्रबिंदू आहे. या भागातील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांना लक्ष्य करून बलुच बंडखोर गटांनी यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत.