पुणे : शहरातील ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवरून विरोधी पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांची टीका सहन करावी लागत असतानाच, आता भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांनीही पदाधिकाऱ्यांना गुरुवारी घरचा आहेर दिला. ‘पुणे महापालिकेची स्थायी समिती आणि प्रशासन नागरिकांच्या गैरसोयीबाबत गंभीर नाही,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.

आमदार टिळक यांनी त्याच्या महापालिकेच्या आर्थिक तरतुदींमधील एक कोटी रुपयांचा निधी शिवाजी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी देण्याचे पत्र दिले होते. त्याबाबत स्थायी समिती अध्यक्ष रासने यांच्याशी आपली चर्चाही झाली, मात्र त्यानंतरही वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने दोन महिने पुढे ढकलल्याची टीका टिळक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. बाजीराव रस्त्यावर उड्डाणपुलासाठी नगरसेवकांनी सुचविलेल्या विकास कामांच्या निधीत (‘स’ यादी) दोन कोटी रुपयांची तरतूद टिळक यांनी केली होती. यातील एक कोटी रुपयांची तरतूद शिवाजी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून द्यावी, असे पत्र त्यांनी स्थायी समितीस दिले होते. समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. महापालिकेची मुदतही आता दोन महिने राहिली नसल्याने आमदार आणि माजी महापौरांच्या प्रस्तावालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या घटनेने व्यथित झाल्यामुळे आपण स्थायी समिती आणि प्रशासनाला जाहीरपणे धारेवर धरले, अशी प्रतिक्रिया टिळक यांनी दिली.

ओबीसी आरक्षणावरून अजित पवारांचे रोखठोक मत, आगामी निवडणुकांबाबत म्हणाले…
‘अर्थसंकल्पात बाजीराव रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद होती. परंतु, बाजीराव रस्त्याची रुंदी कमी असल्याने तांत्रिकदृष्ट्या येथे उड्डाणपूल बांधणे शक्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या दोन कोटी रुपयांपैकी एक कोटी रुपये शिवाजी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वर्ग करावेत, असा प्रस्ताव गेल्या नोव्हेंबरमध्ये दिला होता. सध्याची रस्त्याची दुर्दशा पाहता हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे होते. परंतु, प्रशासनाने याबाबतही माझी दिशाभूल केली. सुरुवातीला वर्गीकरणाची गरज नाही, असे सांगितले. परंतु, नंतर रस्ते दुरुस्तीसाठी अधिक तरतुदीची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही दिवसांनी पुन्हा रस्त्यासाठी वर्गीकरण करावयास हवे, असे सांगण्यात आले. यावरून प्रशासनाच्या कारभारात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होते,’ अशी टीका टिळक यांनी केली.

‘वर्गीकरणासंबंधी स्थायी समिती अध्यक्षांशी मी चर्चा केली. प्रशासनास निधीची आवश्यकता असतानाही समितीने वर्गीकरणास नकार देऊन तो प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. समिती आणि प्रशासन नागरिकांच्या गैरसोयीविषयी गंभीर नाही, असेच यावरून स्पष्ट होत आहे. समिती आणि प्रशासनाने परस्परांतील हेवेदावे त्वरित मिटवावेत. शिवाजी रस्ता रहदारीचा आणि महत्त्वाचा असल्याने नागरिकांची सोय होणे जास्त महत्वाचे आहे,’ असा टोलाही टिळक यांनी लगावला आहे.

ओमिक्रॉनबद्दल आली धक्कादायक माहिती समोर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडून इशारा
या रस्त्यासाठी आवश्यक निधी महापालिका प्रशासनाला उपलब्ध झाला होता. त्यामुळे या ठिकाणी वर्गीकरणाची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ते करण्यात आले नाही. या पूर्वीही आमदारांनी सुचविलेली वर्गीकरणे मान्य करण्यात आली आहेत. त्यामुळे हे वर्गीकरण जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात आले, यात तथ्य नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

पर्यटकांसाठी Good News! पर्यटनस्थळं सुरू करण्याबाबत आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here