हायलाइट्स:
- भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
- सुप्रीम कोर्टाचा निर्णय
- देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
- सत्यमेव जयते, सुप्रीम कोर्टाचे आभार आणि स्वागत, फडणवीसांचे ट्विट
विधानसभेतील १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज, शुक्रवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आणि मनमानी पद्धतीने करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले आहे. या निर्णयानंतर आता भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालानंतर ट्विट केले आहे. ‘सत्यमेव जयते! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आणि आभार, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने लोकशाही मूल्ये वाचतील आणि हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारला मिळालेली जोरदार चपराक आहे, असेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार हे स्वैर सुटलेले सरकार आहे, असे यावरून दिसते, असे शेलार म्हणाले. तुमचा अहंकार तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही हे या तीन पक्षांनी लक्षात ठेवावे, असंही ते म्हणाले.
या आमदारांचे निलंबन रद्द
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यात आले होते. संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, हरिश पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, पराग अळवणी आणि राम सातपुते या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते. सुप्रीम कोर्टाने या आमदारांचे निलंबन रद्द केले आहे.