हायलाइट्स:
- भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
- सुप्रीम कोर्टाचा निकाल
- विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय कधी घेणार? नवाब मलिकांनी दिली माहिती
- टिपू सुलतान वादावरही नवाब मलिक यांनी दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ निलंबित आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज, शुक्रवारी निकाल दिला. या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
१२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा निर्णय नाही. हा विधीमंडळाचा निर्णय होता. विधीमंडळाचे अधिकार व न्यायालयाचा आदेश याबाबत जो काही अभ्यास करायचा असेल, तो विधीमंडळ सचिवालय करेल आणि अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध – मलिक
भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध आहे, हे स्पष्टपणे दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजप टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण करत आहे. तुम्ही राज्यघटना पाहिली किंवा वाचली आहे का, असा थेट सवाल नवाब मलिक यांनी भाजपला विचारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील भाग – १५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंदसिंगजी यांचे छायाचित्र व कार्याचा गौरव करणारा उल्लेख केला आहे. तर भाग – १६ मध्ये राणी लक्ष्मीबाई व टिपू सुलतान यांचे छायाचित्र व त्यांच्या कार्याच्या गौरवाचा उल्लेख आहे. म्हणजेच भाजप घटनेला विरोध करतेय, असे स्पष्ट दिसते, असेही मलिक म्हणाले.