हायलाइट्स:
- महिलेच्या तोंडावर अॅसिड फेकल्याची घटना
- महिलेची प्रकृती गंभीर
- आरोपीला पोलिसांनी केली अटक
कुरुंदवाड पोलीस आणि सीपीआर हॉस्पिटल पोलीस चौकीतून या घटनेची माहिती देण्यात आली. पीडित महिला ही ४० वर्षांची असून हातकणंगले येथील एका शिक्षण संस्थेत आया म्हणून काम करते. गुरुवारी सकाळी संशयित दादासाहेब जोशी याच्या घरातून पीडित महिला दुचाकीवरून इचलकरंजीला जाण्यासाठी बाहेर पडली. दुचाकीवरून काही अंतरावर गेल्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यामुळे रस्त्यातच गाडी थांबवून संशयिताने सोबत आणलेल्या बाटलीतील ॲसिड तिच्या तोंडावर फेकले.
यावेळी पीडितेने आरडा-ओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. दरम्यान संशयिताने तेथून पळ काढला.
महिलेचा चेहरा भाजल्याने तिला खासगी वाहनातून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र जोशी या संशयितास ताब्यात घेतलं आहे. संशयिताने महिलेच्या तोंडावर अॅसिड का फेकले, याचा पोलीस तपास करत असून ही घटना आर्थिक वादातून घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.