हायलाइट्स:
- वाईन विक्रीच्या निर्णयावरून संभाजी भिडे आक्रमक
- ‘संपूर्ण मंत्रिमंडळाने माफी मागावी’
- संभाजी भिडेंची मागणी
संपूर्ण मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन माफी मागावी, अशी मागणीही संभाजी भिडे यांनी केली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली धारकऱ्यांनी आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन दिलं. महाराष्ट्र सरकारने दुकाने आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नितीमत्तेचा, शीलाचा संहार करणारा आहे, असं मत भिडे यांनी निवेदनातून व्यक्त केलं आहे.
‘…तर धारकरी रस्त्यावर उतरणार’
वाईनविक्रीच्या मुद्द्यावरून संभाजी भिडे यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. ‘उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील, संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेकडे नेणारा हा राष्ट्रघातक निर्णय आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी मंत्रिमंडळाने सामूहिक क्षमा मागावी. राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे न घेतल्यास समाजात संतापाची लाट उसळेल. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा सरकारच्या निर्णयाविरोधात धारकरी रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा भिडे यांनी दिला आहे.