राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर टीका केली. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शेतकरी, कष्टकरी, गरीब, बारा बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने करोनाच्या काळात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ दारूलाच आहे. महाविकास आघाडी सरकार नेमके आहे तरी कोणाचे, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. हे सरकार सत्तेच्या नशेत धुंद असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर दिले आहे. विरोधच करायचा असेल तर, तुमच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाइनरी आणि बीअरचे कारखाने बंद करून बाटलीबंद पाणी विक्री करावी, असा सल्ला क्रास्टो यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
12 आमदारांचं निलंबन लोकशाही वाचवण्यासाठी | संजय राऊत
शिवसेनेनेही दिले होते प्रत्युत्तर
वाइन ही फळांपासून बनवली जाते आणि शेतकरी ती फळे पिकवत असतो. सरकारने वाइनच्या विक्रीला सूट दिली आहे. सुपर मार्केटमध्ये ती विक्री करता येणार आहे. त्याला काही राजकीय पक्ष विरोध करत असतील तर, ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. उत्पादन वाढले तर, चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय आहे. राजकीय पक्ष आता या क्षणी टीका-टिप्पणी करत आहे. त्यांनी थोडंसं शतकऱ्यांचं आर्थिक गणित समजून घ्यावं. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत आणि ते धाडसाने घ्यावे लागतात, असे ते म्हणाले.