नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. इथं केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊसही पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.
नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार…
पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम राहील. उत्तर प्रदेशातही वेगळ्या भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही लोकांना थंडीपासून सुटका मिळणार नाही. मात्र, पुढील २४ तासांनंतर पूर्व राजस्थानमधील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळू शकतो.