नांदेड : माझ्या किनवट-माहूर या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी गृहमंत्र्यांना केली आहे. भाजपचे आमदार केराम यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना याबाबतीत सविस्तरपणे पत्र लिहून मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवैध धंदे बंद करण्याबाबत अनेकदा भेटून आपण मागणी केली. मात्र, ते ऐकत नसून तुम्हीच त्यांना हे अवैध धंदे बंद करण्याबाबत आदेश द्या असे साकडे आमदारांनी थेट गृहमंत्र्यांना घातलं आहे.

सध्या मी आजारी असून देखील अवैध धंदे बंद झाले नाही तर मला आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा आमदार केराम यांनी पत्राच्या शेवटी दिला. आमदारांच्या या पत्रामुळे नांदेडच्या पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून स्वतः आजारी असून देखील आमदार केराम यांनी अवैध धंद्याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महिन्याला १ लाख ७५ हजार कमावणाऱ्या युवा शेतकऱ्याने सांगितलं यशाचं ‘गुपित’
नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर हे आदिवासी बहुल तालुके आहेत. या भागातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवत असतात. मात्र, या दोन्ही तालुक्यात गावठी दारू, जुगार अशा अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. त्यातून भोळसर नागरिक गावठी दारूचे सेवन करत जुगार खेळण्याच्या आहारी जात आहेत. त्यातून अनेक स्त्रिया या अकाली विधवा बनत आहेत, असा दावा आमदार केराम यांनी आपल्या पत्रात केला आहे.

आमदारांच्या या धक्कादायक पत्रामुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन्ही तालुक्यात अपुरे पोलीस बळ आहे. त्यामुळे या भागात अवैध धंद्याना नेहमीच मोकळे वातावरण मिळत असते. आता आमदारांच्या या तक्रारीमुळे अवैध धंद्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता आमदारांच्या या पत्रावर राज्याचे गृहमंत्री काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here