पुणे: राज्यातील मास्कबंदी उठवण्यात येणार, अशी चर्चा सध्या सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी चर्चा झाल्याचे वृत्त काहींनी दिले. मात्र, हे वृत्त धादांत खोटे आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुखवटा लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी पु्ण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील मास्कबंदी उठवली जाणार असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.

यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, अशी चर्चाच झाली नाही. माध्यमांनी यासंदर्भात नीटपणे माहिती घेऊन बातमी द्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांसह आमचा आग्रह आहे. परदेशात इंग्लंडसारख्या देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना लखलाभ आहे, मला त्यावर बोलायचं नाही. आपल्या राज्यात तशाप्रकारची चर्चाही नाही. तसा कोणता निर्णयही झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

एसटी कामगारांनी टोकाची भूमिका सोडावी, कामावर रुजू व्हावे: अजित पवार

या पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. न्यायालयाने जे काही निर्णय दिले आहेत, त्यानंतर आता नवीन काही घडेल असे वाटत नाही. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेली समिती अहवाल सोपवेल. पण कामगार न्यायालयाने एसटी संपासंदर्भात अनेक निर्णय दिले आहेत. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता समंजसपणे वागावे. इतके दिवस एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार होता, तोदेखील आता बऱ्यापैकी वाढला आहे. त्यामुळे एसटीचा कारभार पूर्वपदावर आला पाहिजे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा विचार करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

पुण्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रुवारीपासून सुरु होणार
संविधानाने विधिमंडळाला काही अधिकार दिले आहेत, १२ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने राज्य विधिमंडळातील भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाबाबत महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केले. संविधान तयार झाले तेव्हा विधिमंडळाला अधिकार देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधिमंडळातील संबंधित पदाधिकारी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेतील. विधिमंडळाचा परिसर हा तेथील पदाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असतो. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

वाईन आणि दारुत मोठा फरक असतो, विनाकारण गैरसमज: अजित पवार

राज्यातील सुपरमार्केटसमध्ये वाईन उपलब्ध करुन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सध्या विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी म्हटले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. वाईन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. महाराष्ट्रात उत्पादन होणारी सर्व वाईन राज्यात खपत नाही. इतर राज्यांमध्ये आणि परदेशात ती निर्यात केली जाते. पण काहीजण मद्यराष्ट्र वगैरे बोलून विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत, त्यामुळे जनतेचं नुकसान होईल, असे निर्णय घेणार नाही. मध्य प्रदेश सरकारने तर दारु घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यावरुन टीका करु शकतो, पण तसे करणार नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here