चीनमधील ‘वुहान’ शहरातील शास्त्रज्ञांनी ‘निओकोव्ह‘ नावाच्या नव्या करोना विषाणू संदर्भात जगाला सावध केलंय. हा विषाणू करोनापेक्षाही अत्यंत धोकादायक आहे. ‘निओकोव्ह’च्या संक्रमणाच्या जाळ्यात अडकणाऱ्या तीन पैंकी एक रुग्ण दगावण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनं यासंबंधी अधिक अभ्यासाची गरज व्यक्त केलीय.
‘निओकोव्ह’ हा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळून आलाय. अत्यंत तेजीनं फैलावण्याची या विषाणूची क्षमता आहे. करोना विषाणूप्रमाणेच मानवाच्या पेशींमध्ये दाखल होऊन रुग्णाला मृत्यूच्या द्वारापर्यंत हा विषाणू नेऊ शकतो, असं मत वुहान विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलंय.
आपल्या सद्य स्वरुपात केवळ एकदा बदल केल्यानंतर हा विषाणू मानवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मानवी पेशींमध्ये घुसखोरी करण्यासाठी या विषाणूला केवळ एक उत्परिवर्तन आवश्यक आहे.
‘निओकोव्ह’ विषाणूवर चीनच्या अभ्यासानंतर, ‘रशियन स्टेट व्हायरोलॉजी अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’च्या तज्ज्ञांनीही गुरुवारी एक निवेदन जारी केलंय.
कसा आणि कुठे आढळून आला हा विषाणू?
दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू वटवाघुळांत सापडला आहे. आतापर्यंत हा विषाणू केवळ प्राण्यांमध्ये फैलावल्याचं आढळून आलं होतं. मात्र, लवकरच हा विषाणू मानवांमध्येही पसरण्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.
‘निओकोव्ह’ची लक्षणं काय आहेत?
ताप, खोकला आणि श्वासोच्छवासात अडथळा अशी काही लक्षणं ‘निओकोव्ह’ संक्रमणात दिसून येतात. ही लक्षणं बऱ्याचशा प्रमाणात करोना विषाणूप्रमाणेच आहे. हा विषाणू २०१२ ते २०१५ या काळात मध्य पूर्वेतील देशांमध्ये फैलावल्याचं उघड झालं होतं. या विषाणूच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता.
‘निओकोव्ह’ किती धोकादायक?
या विषाणूचा संसर्ग आणि मृत्यू दर खूप जास्त असल्याचं संशोधनातील परिणामांच्या आधारे सांगण्यात येतंय. या विषाणूमुळे मृत्यू दर जवळपास ३५ टक्क्यांपर्यंत अधिक आहे. म्हणजेच प्रत्येक तीन बाधितांपैकी एकाचा मृत्यू होतो.
‘निओकोव्ह’ची उत्पत्ती कशी झाली?
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, विषाणूच्या उत्पत्तीबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विषाणूच्या जीनोम विश्लेषणानंतर तो वटवाघळांमध्ये पहिल्यांदा आढळून झाला आणि नंतर तो काही उंटांपर्यंतही फैलावल्याचं दिसून आला.
‘निओकोव्ह’ला घाबरण्याची आवश्यकता नाही
निओकोव्ह हा करोना व्हायरस ‘मर्स कोव्ह विषाणू’शी संबंधित आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग पहिल्यांदा आढळून आला होता. सध्या निओकोव्ह हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांत आढळून आला आहे. अजूनपर्यंत या विषाणूचं संक्रमण केवळ प्राण्यांतच आढळून आलंय. त्यामुळे या विषाणूला घाबरण्याची गरज नसली तर सतर्कतेची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.