राज्याचे पोलीस महासंचालक (जीडीपी) संजय पांडे यांच्या वतीने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे.
सर्वसाधारणपणे, पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासांची शिफ्ट असते. गुरुवारी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला अधिकाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर, अमरावती शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये लागू करण्यात आला होता.
आपत्कालीन परिस्थितीत हा निर्णय लागू नाही
आपत्कालीन स्थितीत किंवा सणासुदीच्या काळात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात. मात्र, ते केवळ संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने करता येऊ शकते.