शेतकऱ्याने माल पाठवला असल्यामुळे विक्री करत असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली. शिवाय शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचेही मत मांडले. तर इतर ठिकाणी सुरू असलेल्या इतर शेतमाल विक्रीचा दाखला देत व्यापाऱ्याने बाजार समिती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी वाद घातला. मात्र, भाजीपाला बाजारात अशा प्रकारे इतर शेतमाल विक्री करणे बेकायदा असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय या व्यक्तीने यापूर्वी देखील अशाच प्रकारे फळे मागवली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक हा व्यापार केला जात होता.
भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात ए आणि डी पाकळीमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाची बेकायदा विक्री सुरू आहे. या लोकांवर बाजार समिती का कारवाई करत नाही, असा सवाल केला जात आहे. या कारवाई निमित्ताने भाजीपाला व्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईच्या मागणीने जोर धरला आहे. कांदा बटाटा मार्केट सकाळी ८ वाजता सुरू होत असल्याने रात्री भाजीपाल्याबरोबर कांदा-बटाटा पुरवठ्यासाठी भाजीपाला बाजारात आणला जातो. मात्र, असे सांगून येथे राजरोसपणे व्यापार करताना दिसत आहे. तर याबाबत बाजार समिती प्रशासन दंडात्मक कारवाई हाती घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारे अवैध व्यापार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सभापती अशोक डक यांनी दिली.