कल्याणमधील काळा तलाव परिसरात एक तरूण पिस्तुल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारी रात्री मिळाली होती. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरिक्षक प्रदीप पाटील यांनी पोलिसांची दोन पथक तयार केली आणि कल्याण पश्चिमेकडील काळा तलाव परिसरात गस्त घालण्याच्या सूचना दिल्या. पोलीस गस्तीवर असतानाच, एका व्यक्तीने काळा तलाव परिसरात असलेल्या एका टपरीसमोर हवेत गोळीबार केल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पोलिसांनी तात्काळ तलाव परिसरात धाव घेतली. गोळीबार करणाऱ्या तरुणाला संबंधित ठिकाणी दिसताच संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पिस्तुल सापडले. त्यानंतर अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तुल जप्त केले. गणेश राजवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहतो. हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निवृत्त शिपायाने उघडला दवाखाना,घेतले 5 बळी
गोळीबार होत असताना काही लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे व्हिडिओतून लक्षात येते. ते कोण होते? ते सर्व गेले कुठे? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी गणेशकडून दोन पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि दुचाकी हस्तगत केली आहे. हे पिस्तूल त्याने कशासाठी आणले होते, ते कुणाला विक्री करणार होते, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.