करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक असेल, अशी शक्यता अनेक तज्ज्ञांनी खूप आधी व्यक्त केली होती. या लाटेत मोठ्या संख्येने मुले बाधित होत असल्याचे आकडेवारीवरून सध्या तरी दिसून येत आहे. याबाबत एका वृत्तसंकेतस्थळाला माहिती देताना, डॉ. निलेश गुजरर यांनी सांगितले की, ‘माझ्या क्लिनिकमध्ये काही रुग्ण आले होते. त्यातील काही जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर एनआयव्ही पुणे येथे काही जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या चार मुलांच्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट बीए २ आढळून आला आहे. सध्या यावर अभ्यास सुरू आहे.’
ओमिक्रॉनच्या दोन्ही व्हेरियंटची लक्षणे सारखीच
ओमिक्रॉनचा नवीन व्हेरियंट किती घातक आहे, याची सविस्तर माहिती घेतली जात आहे. डॉ. निलेश गुजर यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन बीए १ आणि बीए २ व्हेरियंटमध्ये अनेक लक्षणे एकसारखीच आहेत, असे दिसून आले आहे. या दोन्ही व्हेरियंटच्या संसर्गामुळे घसा खवखवणे किंवा दुखणे, डोळे दुखणे किंवा जळजळ होणे, लहान मुलांचे हातपाय दुखणे आदी लक्षणे आढळून आली आहेत.
चिंता करू नका!
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी करोनाच्या या नवीन व्हेरियंट संबंधित काही महत्वाची माहिती दिली आहे. करोनाचा नवीन व्हेरियंट NeoCov संबंधी चर्चा सुरू आहे. हा करोनाचा आतापर्यंतचा सर्वात घातक व्हेरियंट असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून संशोधन सुरू आहे. मात्र, यामुळे चिंता करण्याची गरज नाही.