मुंबई, पुण्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या अहवालानुसार, राज्यात आज, शनिवारी (गेल्या २४ तासांतील आकडेवारी) ८५ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ४४, तर मुंबईत ३९ नवीन ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. पुणे ग्रामीण आणि अकोला येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ३१२५ ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात करोना रुग्णांमध्ये किंचित वाढ
राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शनिवारी करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आज राज्यात २७,९७१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ६१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १. ८५ टक्के एवढा आहे. याच कालावधीत राज्यात ५०, १४२ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ७२,९२,७९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४३,३३,७२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६,८३,५२५ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११, ४९, १८२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३, ३७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईतील चित्र बदलतेय
मुंबईत शनिवारी १४११ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १०, ४४, ४७० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा हा १६६०२ इतका आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.