मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाइन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांच्या परिवाराने १६ एप्रिल २०२१ मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटले की, अशोक गर्ग हे २०१० पासून दोन कंपन्या चालवतात. यापैकी एक कंपनी वाइन वितरणाचा व्यवसाय करते. मुंबई आणि पुणे परिसरातील हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये अशोक गर्ग यांच्या कंपनीकडून वाइन पुरवली जाते. या व्यवसायात अशोक गर्ग यांच्या कंपनीची एकाधिकारशाही आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण १०० कोटी इतकी आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. संजय राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. येत्या काही दिवसांमध्ये मी लवकरच संजय राऊत यांच्या आणखी एका व्यवसायाचे तपशील जाहीर करेन, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.
दारू नव्हे, वाइनविक्रीला परवानगी
संजय राऊत यांची वाइन उद्योगात गुंतवणूक असल्यामुळे ते आता राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. वाइन म्हणजे दारु नव्हे, असा युक्तिवाद ते करत आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

वाईन म्हणजे दारु नाही अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. राज्यात वाईनची विक्री वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे संजय राऊतांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप नेते फक्त विरोध करतात ते शेतकऱ्यांसाठी काहीही करु शकत नाहीत असा पलटवार संजय राऊत यांनी भाजपवर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here