वादंगांशी जुने नाते
मौलाना साद यांचा जन्म १० मे १९६५ रोजी दिल्लीत झाला. साद यांनी हजरत निझामुद्दीन मरकझचा मद्रसा काशिफूल उलूममधून सन १९८७ मध्ये आलिमची पदवी घेतली. मौलाना साद यांचे वादंगांशी जुनेच नाते आहेत. त्यांनी स्वत:ला तबलीघी जमातीचे एकछत्री अमीर (संघटनेचे सर्वोच्च नेते) घोषित केले. त्यानंतर जमातीच्या वरिष्ठ धर्मगुरूंनी त्यांचा कडाडून विरोध केला. मात्र, मौलानांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. यानंतर वरिष्ठ धर्मगुरूंनी आपली वेगळी वाट चोखाळली. यानंतर साद यांची एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली. ‘मैं ही अमीर हूं… सबका अमीर…. अगर आप नहीं मानते तो भाड मे जाइए’, असे त्यांनी या क्लिपमध्ये म्हटले आहे.
स्वत:ला घोषित केले सर्वोच्च नेता
तबलीघी जमातीचे माजी अमीर मौलाना जुबैर उल हसन यांनी संघटनेच्या नेतृत्वासाठी सुरू समितीची स्थापना केली होती. त्यानंतर साद यांनी स्वत:ला अमीर घोषित केले. याच कारणामुळे साद यांना विरोध सुरू झाला. मात्र, जुबैर यांचा मृत्यू झाल्यानंतर मौलाना साद यांनी कुणालाही विश्वासात न घेताच स्वत:ला सर्वेसर्वा घोषित केले. मौलाना साद हे जमातीच्या संस्थापकाचे पणतू आणि जमातीच्या दुसऱ्या अमीरचे नातू असल्याने जमातील लोकांची त्यांच्यावर श्रद्धा कायम होती.
साद यांच्यावर देवबंदचा फतवा
मौलाना साद हे कुराण आणि सुन्नाची चुकीची व्याख्या करतात असे म्हणत सन २०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात दारु उलूम देवबंदने तबलीघी जमातीशी संबंधित मुस्लिमांविरुद्ध फतवाही जारी केला होता.
या बरोबरच सन २०१६ च्या जून महिन्यात मौलाना साद आणि मौलाना मोहम्मद जुहैरुल हसन यांच्या नेतृत्वातील तबलीघी जमातीच्या दुसऱ्या गटात हिंसेची घटनाही घडली आहे. त्यांच्या दोन गटांनी एकमेकांवर हत्यारांनिशी हल्ला केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times