अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय ३५, राहणार पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. नगर) असं सदर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. हा खोटा आरोप असून स्थानिक पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करून त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं आहे. (Pune Police News)

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार झाला. त्यावेळी तेथे उपस्थित पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

sanjay raut : संजय राऊतांचे सोमय्यांना आव्हान; म्हणाले, ‘आमची वायनरी असेल…’

जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे हे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. त्यांच्याविरूद्ध सुपे पोलीस ठाण्यात पत्नीच्या फिर्यादीवरून २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्न आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पती-पत्नीचं पटत नसल्याने त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. असं असताना मांडगे यांच्याविरोधात ७ जानेवारी २०२२ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खोटा गुन्हा असल्याचा त्यांचा दावा आहे.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळलो असल्याचं सांगून मांडगे सायंकाळी रॉकेलचा डबा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. एका अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी तात्काळ अटकाव केला. त्यावर मांडगे यांनी आरडाओरड सुरू केली. उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी मांडगे यांची समजूत काढून त्यांना भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here