दौंड ते काष्टी दरम्यान रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. दौंड येथे कार्यरत जवान बाबा करांडे काम संपवून आपल्या गावाकडे कारमधून निघाले होते. पहाटेच्या सुमारास काष्टीजवळ उसाने भरलेल्या टॅक्ट्रर ट्रॉलीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे कारची ट्रॉलीला जोराची धडक बसली. या अपघातात कारंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दौंडमधील त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.
साखर कारखान्यांना ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर बेकायदेशीरणे दोन ट्रॉली जोडून नेतात. शिवाय रात्रीच्या अंधारात ट्रॉली लक्षात येईल याची दक्षताही घेतली जात नाही. क्षमतेपेक्षा जास्त ओझे नेताना ट्रॉक्टरचा वेग मंदावतो. अडकत अडकत आणि वळणे घेत सुरू असलेल्या ट्रॅक्टरचा प्रवास इतर वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या अंधारात असे अपघात होण्याचे प्रकार सतत घडतात. यासंबंधी परिवहन विभागाने कारखाने आणि ट्रॅक्टरचालकांना दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्षच केलं जात असल्याचं दिसून येत आहे.