सांगली : सांगलीतील वखारभाग परिसरात भेळ खाण्यासाठी मालक गाडीतून उतारल्यानंतर अज्ञातांनी गाडीची काच फोडून ३ लाख रुपयांची रक्कम लांबवली होती. चोरीचा हा प्रकार गाडीच्या ड्रायव्हरनेच त्याच्या मित्रांसह केल्याचं उघडकीस आलं आहे. याबाबत सांगली शहर पोलिसांनी चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली. चालक लक्ष्मण मारुती जावीर (वय ३७,रा. इंदिरानगर मिरज), शक्ती बाबासो मोरे (वय ३१, रा. सुभाषनगर, मिरज) आणि अमर दत्तात्रय संकपाळ (वय २९, रा. कुपवाड) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. (सांगली गुन्हे)

सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील वसीम नायकवडी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. शुक्रवार २१ जानेवारी रोजी आर्थिक व्यवहारातील कामासाठी ते मित्रासमवेत कारमधून जयसिंगपूरला गेले होते. परत येताना त्यांनी ६ लाख ५० हजार रुपये दोन वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये घेऊन ही रक्कम गाडीत ठेवली. वखारभाग येथे आल्यानंतर ते मित्रासमवेत भेळ खाण्यासाठी थांबले होते. कारचालकही गाडीबाहेर आला होता. त्याचवेळी गाडीतील रोख रकमेची एक पिशवी चोरीला गेली. या प्रकरणी त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिरायला गेल्यानंतर वृद्धासोबत अचानक घडलं असं काही की जागीच गमावला जीव!

पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेला पुढील तपासाचे आदेश दिले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी वखारभाग आणि जयसिंगपूरमध्ये ज्या ठिकाणी व्यवहार झाला, अशा २५ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रवासादरम्यान गाडीच्या पुढे आणि पाठीमागे प्रवास करणारे सर्व संशयित आणि वाहनांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी नाईकवाडे यांचा कारचालक लक्ष्मण जावीर याच्या हालचाली संशयास्पद असल्याचं आढळलं. प्रवासादरम्यान त्याने मोबाईलवरून काही व्यक्तींना फोन केले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू करतात जावीर गडबडला.

पेण पोलिसांना धक्का; कोठडीतील आरोपी शौचालयातून पळाला

चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलल्यानंतर त्याने आपण करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितले. यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला. कारचालक जावीर हाच चोरीचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीसाठी मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी झालेली ३ लाख १४ हजारांच्या रकमेसह एकूण ३ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, समीर ढोरे, गुंडूपंत दोरकर, विनायक शिंदे, दीपक कांबळे, अक्षय कांबळे, विक्रम खोत, अभिजित माळकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here