स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावात गुरुवारी २७ जानेवारी रोजी श्रीधर सदाशिव मोरे हे १२ किलो १३८ ग्रॅम चांदी दुचाकीवर घेऊन जात असताना दोन मोटार सायकलस्वार बिरदेव मंदिराच्या मागील माळावरुन त्यांच्या समोर आले. एका मोटार सायकलने मोरे यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने ते दुचाकीवरुन खाली पडले. मोरे यांना बोलण्यात गुंतवून अन्य तिघांनी चांदीची पिशवी घेऊन पोबारा केला. त्यानंतर माने यांनी हुपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता या शाखेकडील पोलीस हवालदार आयुब गडकरी यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांची माहिती मिळाली. चोरलेल्या चांदीची विक्री करण्यासाठी आरोपी इचलकरंजीतील वडगाव बाजार समितीच्या मेन गेटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पेलिसांनी सापळा रचला.
बाजार समितीच्या परिसरात दोन मोटार सायकलवरुन चौघे आल्यावर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असताना पोलिसांनी चांदी जप्त केली. पोलिसांनी ओंकार शिवाजी पाटील (वय २४), सुरेश रामचंद्र माळी (वय २४, दोघे रा. रेंदाळ), कृष्णा अरुण रावण (वय २२), भरमा बसाप्पा पाथरवट (३५. दोघे रा. इचलकरंजी) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
या गुन्ह्यात राहुल उर्फ सोन्या पाथरवट आणि रणजीत एडके (दोघे रा. इचलकरंजी) असल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सहाय्यक फौजदार राजीव शिंदे, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, रणजीत पाटील, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, संजय इंगवले, फिरोज बेग, अमर शिरढोणे, सोमराज पाटील, सुरज चव्हाण, यशवंत कुंभार यांनी तपासात भाग घेतला.