दक्षिण मुंबईतील ४८ परिसरांमध्ये करोनाचे संशयित रुग्ण किंवा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी वरळी कोळीवाड्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक १३ रुग्ण प्रभादेवीच्या चाळीत आढळून आले आहेत. २४ मार्च रोजी येथील एका खानावळ चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर तीन दिवसानंतर या महिलेचा मृत्यू झाला होता.
वरळी कोळीवाड्यात एकूण ८० हजार लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाची करोनाची चाचणी करणं पालिकेला शक्य नाही. त्यामुळे कोळीवाड्यात आजपासून आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात २४ तासांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला असून एक रुग्णवाहिकाही या परिसरात ठेवण्यात आल्याचं पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तसेच कोळीवाड्यात दूध आणि किराणा सामानाचा दररोज पुरवठा करणं ही अत्यंत कठिण असल्याचंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.
पश्चिम उपनगरात करोना संशयित असलेले एकूण ४६ विभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यात वांद्रे पश्चिम आणि खारमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याचं आढळून आलं आहे. वांद्रे पूर्वेतील हिल रोड, एसव्ही रोड, २१वा रोड, गव्हर्नंमेंट कॉलनी, गोरेगाव पूर्वेतील बिंबीसार नगर सील करण्यात आले आहेत. अमेरिकेतून आलेली एक २५ वर्षीय तरुणी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी संध्याकाळी हे परिसर सील करण्यात आले आहेत.
तर पूर्व उपगनरातील ४८ परिसर सील करण्यात आले आहेत. चेंबूर आणि घाटकोपरमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. चेंबूर आणि घाटकोपरमध्येच ३५ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही आधीच पोलिसांच्या मदतीने नो गो झोन तयार केल्याचं महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांनी सांगितलं.
मालमत्ता ताब्यात घेणार
दरम्यान, मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व २४ वॉर्डातील रिकाम्या जागा, इमारती, इमारतीतील फ्लॅट, लॉज, हॉटेल्स, क्लब्स, प्रदर्शन केंद्र, महाविद्यालये, हॉस्टेल्स, जिमखाने शोधून त्यात विलगीकरण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times