प्रदूषणामुळे जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारी जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या वर्षी प्रथमच तण नाशकांचा वापर करण्यात आला. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. यंदा प्रवाहातील जलपर्णीचे हिरवे थर नाहीसे होऊन नदीचा निळाशार प्रवाह दिसू लागला आहे. नदी पात्रात निरनिराळे पक्षीही दिसू लागले आहेत. ठाणे जिल्ह्याची पाण्याची गरज भागवण्यासाठी सध्या उल्हास नदी आणि बारवी धरण हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे उल्हास नदीपात्रातील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. नदी किनारी वेगाने वाढणाऱ्या शहरांमधील घरातील आणि औद्योगिक सांडपाणी पुरेशी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गेली काही वर्षे संपूर्ण नदीपात्राला जलपर्णीने वेढा घातला होता. जलपर्णीमुळे पाणी पुरवठ्याबरोबरच नदीतील जलजीवनही धोक्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गेल्या वर्षी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने उल्हास नदी संवर्धन मोहीम हाती घेतली. त्यासाठी सगुणा रूरल फाऊंडेशनची मदत घेण्यात आली. ड्रोनच्या साह्याने नदीपात्रावरील जलपर्णीवर तणनाशक फवारण्यात आले. त्यामुळे काही महिन्यांतच जलपर्णी नाहीशी झाली. यंदा नदीच्या पात्रात फारशी जलपर्णी नाहीये.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने उल्हास नदी संवर्धनाची मोहीम हाती घेतली. यावेळी उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांची मदत घेण्यात आली. भडसावळे यांनी सगुणा जलसंवर्धन तंत्राच्या माध्यमातून या जलपर्णीवर ड्रोनच्या सहाय्याने तणनाशक फवारणी केली. आठ महिन्यानंतर उल्हास नदीच्या पाण्यावर असलेली जलपर्णी नाहीशी झाली आहे. आता या नदीत सोडले जाणारे सांडपाणी लवकरात लवकर बंद करावे, अशी मागणी होत आहे. या उल्हास नदीतून ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूरसाठी पाणी उचलले जाते.