त्यावर नितेश राणे यांचे वकील सतिश मानशिंदे यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या अशिलाला १० दिवसांचा वेळ दिला आहे. आमच्याकडे कायदेशीर प्रक्रियेकरता वेळ असल्याचे सतीश मानशिंदे यांनी सांगितले. यापूर्वी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात तब्बल चार दिवस सुनावणी सुरु होती. त्यानंतर नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता आजच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना नियमित जामीन फेटाळल्यास त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
तर दुसरीकडे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संतोष परब यांनीही आज न्यायालयात उपस्थिती लावली. यावेळी संतोष परब यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडत, नितेश राणे यांना जामीन देऊ नये, अशी मागणी केली.
कणकवलीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्र न्यायालय असलेल्या ओरोस आणि कणकवली परिसरात भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कणकवलीत चौकाचौकात पोलिसांच्या तुकड्या दिसत आहेत. याशिवाय, शहरात राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.