महाराष्ट्राच्या विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी केलेले निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवले. या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. यावरून आता भाजपने या दोन्ही नेत्यांसह थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत संजय राऊत, अनिल परब यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान आणि अपमान आहे. या दोघांच्या विधानांना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची संमती आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणारे पत्र त्यांना पाठवले आहे. २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, अन्यथा त्यांची या दोघांनी केलेल्या वक्तव्यांना संमती आहे, असे गृहीत धरून संजय राऊत, परब यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
‘तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही’
कोर्टात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला असतानाच, अतुल भातखळकरांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाइट हाउसमध्ये त्यांचा अध्यक्ष असेल, असे ते सांगू शकतात, पण काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, राज्यात पुढील २५-३० वर्षे त्यांची सत्ता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते, त्यावर भातखळकरांनी राऊतांवर टीका केली आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही, असं ट्विट त्यांनी केलं आहे.